डिजीटल बँकिंग क्रांती पतसंस्थासाठी भविष्य ….
अर्थव्यवस्थेत क्रांती घडवणारी डिजीटल बँकिंग सेवा रोज अपडेट होत आहे.
महाराष्ट्रात सहकारी पतसंस्था चळवळ खोलवर रुजली असुन देशाला दिशादर्शक म्हणुन काम करत आहे.
राष्ट्रीयकृत, खासगी बँका व सहकारी बॅंका यांच्या तुलनेत ग्रामीण भागात जाळे असलेली,खोलवर रुजलेली व सर्वसामान्यांना स्वःची हक्काची वाटणारी ही बॅंकींग सेवा देणारी चळवळ आता सर्वोत्तम सोयी सुविधा देण्यासही पुढाकार घेत आहे.
आताच्या काळात पतसंस्थेत असणारी पारंपरिक पद्धती जाऊन डिजिटलायझेशनचे वारे सुरू झाले आहे. तरुण व मध्यमवयीन ग्राहकांना आकृष्ट करुन त्यांना घरबसल्या अथवा कामाच्या ठिकाणी सेवा देणे गरजेचे झाले आहे. अशा वेळी डिजीटल बँकिंग हाच सर्वात्तम पर्याय आहे. त्यामुळे पतसंस्थाना आता Online बॅंकींग सेवे कडे वळावेच लागेल.
या सुविधा देण्यासाठी आता मोठी आर्थीक तरतुदही करणे क्रमप्राप्त आहे. हा खर्च न समजता गुंतवणुक समजणे महत्वाचे!
पतसंस्थाच्या संचालकांना याची जाणीवही झाली आहे.
edp चा स्वतंत्र विभाग सुरू करून त्यामार्फत आपल्या डिजिटल बॅंकींग व्यवस्थेची देखरेख व कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देणारी यंत्रणा आता कार्यरत होत आहे. याचे चांगले परिणामही दिसून येत आहेत.
डिजिटल प्रणालीमध्ये मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, मोबाईल अलर्ट, पॉस मशीन, पासबुक प्रिंटर, कॅश डिपॉझीट मशिन, क्रेडिट,डेबिट कार्ड,QR कोड यासह विवीध डिजिटल सेवा येतात.
तंत्रज्ञानाचा वापर आज देशात प्रत्येक क्षेत्रात अनिवार्य बनला आहे. पतसंस्थाही आता बँकिंग क्षेत्रांशी स्पर्धा करत असुन काही पतसंस्थाची ऊलाढाल बॅंकेपेक्षाही जास्त आहे,हेही लक्षात घ्यायला हवे.
आता आपली सेवा सर्वोत्तम करण्यासाठी पतसंस्थाना पुढाकार घ्यावाच लागेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वच बँकांना काळानुरुप बदलांचे निर्देश दिले आहेत.. काळानुसार ब्रँचलेस,फेसलेस व पेपरलेस बँकिंग प्रत्यक्षात येत आहे. RTGS- NEFT-IMPS ऑनलाईन बँकिंग, टेलिबॅकिंग अशा सुविधांमुळे सेवा अधिक सुलभ व जलद झाली आहे. यासेवा देण्यात आता पतसंस्थाही माघे राहाणार नाहीत. व्यवस्थापकीय,प्रशासकीय खर्चात बचत होवून व्यवसाय वृध्दीच्या मोठ्या संधी यातुन निर्माण होत आहे,हे त्यांच्याही लक्षात आले आहे. या सेवा देण्यासाठी
गुंतवणुक केल्यामुळे ग्राहकानां नाविन्यपुर्ण सेवांचा लाभ देतानाच पतसंस्थाच्या इतर ऊत्पन्नात मोठी वृध्दी करण्याचीही संधी प्राप्त झाली आहे.तरुण ग्राहक यातुन जोडला जाणार आहे.
फिंनटेक कंपन्या या विवीध सेवा व संधी पतसंस्थाना उपलब्ध करुन देण्यास सज्ज झालेल्या आहेत.
या काळात पतसंस्थाना आपल्या कर्जावरील व्याजदर कमी करण्याबरोबरच ठेवींवरही कमी व्याजदर देण्यासाठी इतर उत्पन्न मिळवुन देण्यात या फिंनटेक कंपन्या मोठा हातभार लावतील.
तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर हा कळीचा मुद्दा बनला आहे. डिजीटल बॅंकींग बरोबरच डिजीटल मार्केटिंग हे अत्यंत गरजेचे व आवश्यक झाले असुन सोशल मिडियाच्या विवीध माध्यमातुन प्रभावीपणे करावे लागेल. फायनान्शियल टेक्नॉलॉजी सेवा देणार्या या फिंनटेक कंपन्या यासाठी पतसंस्थाना मोलाची मदत व मार्गदर्शन करण्यात वाटा उचतील. अशा कंपन्याची यासाठी मदत आता अनिवार्य होणार आहे.
फिंनटेक कंपन्यांकडुन विकसित होणारे APP, सेवा,कर्मचार्यासाठीचे APP ग्राहकांसाठी फायद्याच्या ठरणार असुना2020 पासून अलिबाबाची ही गुहाच आपल्यासाठी उघडली आहे.
तर 2022 नंतर तर आता चॅटजीपीटीने धमालच केली आहे.
पतसंस्था देत असलेल्या मोबाईल APP व Q.R मुळे बॅंकींग सेवा ग्राहकांच्या सोबत 24 तास असणार आहे. आपल्या खात्यातील बॅलन्स पाहणे, पैसे पाठवणे व बोलावणे,विवीध बीलांचा भरणा,खरेदी करताना APP धारकानां विवीध आकर्षक योजना देवु शकणार आहेत.
भविष्यात विविध सेक्युरीटजच्या माध्यमातुन online बॅंकींग अधिकाधीक सुरक्षित होईल.लवकरच व्हाईस एनेबलड पेमेंट सेवा मिळण्याची शक्यता असल्याने हे व्यवहार अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल.आता अनेक आर्थिक कामे सहज व एका बटणावर होणे शक्य होत आहे.
UPI ही सर्वात जलद व सुरक्षित पेमेंट प्रणाली म्हणून उदयास आली आहे. त्यामुळे पतसंस्था मधील व्यवहारही २४ तास व वर्षाचे 365 दिवस करता येणे शक्य होईल. एकूणच युपीआय हे बँकिंग क्षेत्राला वरदानच आहे असे म्हणावे लागेल.
बँकिंग व्यवहाराचे डिजीटलायझेशन सुरु झाल्यावर या माध्यमातून होणार्या व्यवहारांची सुरक्षितताही महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठीच ब्लॉक चेन यंत्रणा आता अस्तित्वात येत आहे. अकाउंट हॅकिंगसारख्या प्रकारांना आळा बसण्यासाठी ब्लॉक चेन चमत्कार ठरणार आहे. या तंत्रज्ञानामुळे डेटा अधिक सुरक्षित बनत चालला आहे. अनेक बड्या बँका आपल्या कामकाजात ब्लॉक चेन यंत्रणा कार्यान्वीत करीत आहेत. यातून अनहॅकेबल डेटा बेस तयार होवून डिजीटल व्यवहारांबाबत सर्वांच्याच मनात असलेली भिती दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. फ्रॉड कमी होवून व्यवहारातील पारदर्शकता वाढेल असे वाटते आहे.
मानवी हस्तक्षेप कमी असल्याने सेवा अधिक गतिमानही होतील.
डिजीटल तंत्रज्ञानामुळे माहितीचा प्रचंड साठा (डेटा) जमा होत आहे. हा डेटा सुरक्षितरित्या जतन करणे व त्याचा उपयोग करून डिजीटल बँकिंगच्या सेवा देणे अत्यावश्यक असते. यासाठी क्लाऊड तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. काही मोठ्या कंपन्यांनी क्लाऊड यंत्रणा तयार करून या ठिकाणी डेटा स्टोरेज व त्यावर आधारित तांत्रिक सेवा, ऍप्लिकेशनची निर्मिती केली आहे. आता पतसंस्थाही या क्लाऊड बँकिंगचा लाभ घेवून स्वत:चा डेटा सुरक्षित ठेवण्याबरोबरच ग्राहकांना नवीन डिजीटल सेवा सहजरित्या देवू शकते. यातून पतसंस्थाची कार्यक्षमता अधिक वाढण्याबरोबरच जास्तीत जास्त ग्राहकांना सेवा देण्यास मदत होणार आहे.
डिजीटल सेवा देण्याचा प्रयत्न पतसंस्था करीत आहेत व ग्राहकांच्या या सेवांची मागणी सातत्याने वाढत आहे. डेटा साठविण्यासाठी करावा लागणारा अवाढव्य खर्च कमी होतो तसेच त्यासाठी मनुष्यबळ, यंत्रणा उभारणीसाठीच्या खर्चातही बचत होते. याशिवाय अनेक डिजीटल बँकिंग सेवा क्लाउडशी थेट जोडल्याने वेळोवेळी त्या अपडेट करणेही सहज शक्य होते.
आजच्या स्पर्धेच्या काळात पतसंस्थाना प्रभावीपणे आपल्या सेवा, योजना लोकांपर्यंत पोहचवता आल्या पाहिजे. त्यासाठी डिजीटल मार्कैटिंगचा वापर गरजेचा झाला आहे. सध्या सोशल मिडियावरील फेसबुक, इन्स्ट्राग्राम,टिटर लिंकेडन सारख्या माध्यमांचा मोठा फायदा होत आहे.पतसंस्थानी याचा वापर व उपयोग करुन आपला ग्राहक आर्कषीत करणे गरजेचे आहे.
कर्जदार मिळवणे, मंजुरी प्रक्रिया, गुंतवणुक सल्ला यासाठीही सोशल मार्कैटींगची मदत होणार आहे. यामुळे संस्थेच्या कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेत वेगाने वृध्दी होणार आहे. प्रशासकीय खर्चात मोठी कपात ही जमेची बाजु असुन टेक्नाॅलाॅजीने हुशार असणारा,कार्यकुशल कर्मचारी ही संस्थेची असेट असणार आहे,. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन,सहकार भारती प्रशिक्षण केंद्र यांच्या मार्फत या बाबतीत विवीध तंज्ञाकडुन प्रशिक्षणाची चांगली व्यवस्था केली असुन कायम स्वरुपी सल्लागारही यासाठी त्यांनी उपलब्ध करुन दिले आहेत.
डिजीटल बँकिंगच्या रुपाने पतसंस्था चळवळीचा चेहरामोहरा बदलणार आहे. हा बदल सर्वांनाच स्वीकारावा लागेल.
श्री.वासुदेव काळे
सहकार सल्लागार
चेअरमन,श्री सिध्दीविनायक पतसंस्था,श्रीरामपूर.
मो.नं.9822837025
दि. 13 मे 23