संत नागेबाबा

सहकार विश्व

तरलता…

👉 आता बदलावे लागेल👈
पतसंस्था पुढे अग्निपरिक्षेचा काळ

सहा महिन्या पासुन आपणास रोज अग्निदीव्यातुन जावे लागत आहे,आधीही हे होतेच पण गेल्या काही महिन्या पासुन रोज नविन गैरव्यवहाराची,चुकीच्या व्यवस्थापना मुळे पतसंस्था अडचणीत आल्याची व त्यांच्या चुकीमुळे इतरांना मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ येते अशा बातम्या वाचायला मिळते आहे.
यावर आपण सर्वांनी एकत्र येवुन,वारंवार बैठका,प्रशिक्षण, चिंतन करणे गरजेचे आहे. या सर्व घटनां मधुन पुढे आलेले वास्तव भयावह आहे,ते आपणा समोर मांडत आहे.

लिक्वीडीटी-तरलता
पतसंस्थाना एकुण ठेवींच्या 25%+ 1% तरलता ठेवण्याचे बंधन आहे व गरजही आहे.परंतु याबाबतीत आपण काळजी घेतो का?
माझे असे वारंवार निर्दशनास आले आहे की,लिक्वीडिटी संपत आल्यावर संस्था चालक फेडरेशन अथवा मदत करु शकणार्‍या संस्था चालकानां भेटीस येतात.परंतु आपली तरलता कमी होते आहे,वसुली नाही,ठेवींचा ओघ नाही हे लवकर लक्षात यायला हवे.तरलता 20% च्या आत येताच तातडीने हालचाल करणे आवश्यक आहे.

चुकीची गुंतवणुक
खुप पतसंस्था चालक गुंतवणुक करताना काळजी घेत नाहीत,अमिशाला-जास्त लाभाला बळी पडतात.खर तर आपण गुंतवणुक कुठे व कशी,कशा प्रमाणात करावी याचे वारंवार मार्गदर्शन होत असते.लेखिपरीक्षकही सांगत असतात.आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करुन वाटेल तिथे पैसा गुंतवतो.यासाठी आपणाकडे गुंतवणुक सल्लागार असायला हवा.

गुंतवणुक कुठे करावी
याचे भान आपण ठेवत नाही,एकाच बॅकेत मोठी गुंतवणुक-मान्यता नसलेल्या ठिकाणी गुंतवणुक ही धोका वाढवते हे आपण विसरतो.एकुण गुंतवणुकी पैकी 5 ते 10% च गुंतवणुक एका बॅकेत असायला हवी.
कुठल्याही पतसंस्था मधील ,मल्टिस्टेट पतसंस्था मधील गुंतवणुक ही पतसंस्थासाठी 100% नियम बाह्य आहे,याचे आपण पालन करतो का?

संस्था चालकांच्या कुटुंबातच मोठे कर्ज वाटप
सर्वात चुकीचे व धोकेदायक असणारे हे कर्ज वितरण आहे.संबधितांची प्रकरणे असल्यामुळे मॅनैजर,CEO दबावाला बळी पडतात व अपुरे,चुकीचे तारण,विनातारण मोठी कर्ज वाटली जातात.अशा वेळी अधिकार्‍यांनी “नाही म्हणायला शिकले पाहिजे”
पतसंस्था मधील पैसा हा ठेवीदारांचा असुन त्यांनी आपल्या विश्वासावर विश्वस्त म्हणुन आपल्या कडे ठेवलेला असतो हे विसरुन आपण पैशाचे मालक व्हायला पहातो.या कालावधीत अडचणीत आलेल्या,बंद पडलेल्या पतसंस्थामध्ये हाच मोठा घोटाळा झालेला आहे.

चुकीचे वाटप-थकबाकी वाढवते
कर्ज वाटतानाच थकबाकीची सुरवात होते असे मी नेहमी म्हणतो.फेडीची क्षमता नसताना वाटप,चुकीचे-वादातील तारण-मुल्यांकन वाढवुन दिलेली कर्जै-एकत्रीत प्रापर्टीवर सर्वांची संमती न घेताना वाटप-हितचींतकांना वाटप, फक्त तारण असलेली मालमत्ता डोळ्या समोर ठेवुन क्षमता नसलेल्या कर्जदारानां मोठे वाटप अशी प्रकरणे सुरवाती पासुनच थकीत होतात व पर्यायाने थकबाकी -NPA होवुन तरतुदी कराव्या लागतात.
थकबाकीदारांवर विलंबाने कारवाई करणे व एकाच न्यायाने कारवाई न करणे
कर्ज थकीत होताच तातडीने कारवाई व्हायला हवी व सर्व कर्जदारांसाठी समान वसुली सुत्र असायला हवे. थकबाकीदार हा थकबाकीदारच समजायला हवा
एखादयाला झुकतेमाप देणे हे फार महागात पडते.101 दावा विलंबाने करणे,दाखला घेवुनही 8-10 वर्ष थांबणे हे खुप धोकेदायक आहे. व अडचणीत येण्याचे सर्वात मोठे कारण आहे.

ठेविंदारानां जास्त व्याज देणे-अमिष दाखवणे
पतसंस्था मधील सरासरी ठेवींचा व्याजदर 8% ते 10% आहे,अशा वेळी 12% ते 15% व्याजाचे अमिष देवुन –
लालची ठेवीदार आर्कषीत होतात
पण कालांतराने आपण त्यांचे मुद्दलही देवु शकत नाही,मग आपल्या कुटनिती मुळे स्वतः बरोबरच किती,संस्था अडचणीत येतात.. ठेवीदार-कुटुंब उध्वस्त होतात याचा कधी विचार केला आहे का?

प्रशिक्षणा पासुन लांब राहाणार्‍या संस्था अडचणीत येतात
या क्षेत्रात 20 वर्षापेक्षा जास्त दिवसां पासुन काम करताना लक्षात आलेली सर्वात मोठी गोष्ट,ज्या पतसंस्था वारंवार दर्जैदार प्रशिक्षण घेत नाहीत, त्याचे अडचणीत येण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे.काळानुसार बदल,बदलणारे कायदे,व्यवहार पध्दती या पासुन अशा संस्था शेकडो मैल दुर असतात.

इतरां बद्दल गैरसमज पसरवणारे अगोदर अडचणीत येतात
असे बरेच धुरीण आहेत ते आपल्या संस्थेची वाढ,उत्कर्ष कसा होईल हे पहाण्यापेक्षा दुसर्‍या संस्थांची बदनामी करण्यात अग्रेसर असतात.त्यांचे चांगुलपण,प्रगती यांना वेदना देते.मग स्वतःअडचणीत आल्यावर कुणीही सोबत येत नाही.

अप्रशिक्षीत संचालक मंडळ
सर्वात धोकेदायक असते.त्यानां संस्था कशा चालवायच्या याची माहीती घ्यायची नसते पण आपण संस्था खुप चांगली चालवतो अशा भ्रमात असतात.अशा वेळी नियम बाह्य -गरज नसताना मालमत्ता घेणे,चुकीच्या ठिकाणी गुंतवणुक-मोठी सुट देणे-प्रकरणे परस्पर सेटल करणे-मोठे कार्यक्रम करणे-नफा नसताना तो दाखवुन डिव्हीडंड वाटणे- ब वर्ग,नाममात्र सभासदां बरोबर व्यवहार करणे अशा चुका करुन अडचणीत येतात.
पतसंस्था चळवळ अडचणीत आणण्यास हेच धुरीण पुढे आहेत,त्यानां बदलावे लागेल.हा जनतेचा पैसा आहे याचे भान ठेवुन वागायला हवे.
तुमच्या मदतीला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन,सहकार भारती सदैव तयार आहे पण चांगले काम असेल तरच!
चुकीच्या कामांमुळे तुम्ही अडचणीत आलात तर मदतीला कुणीही येणार नाही,पण आपण इतर पतसंस्था पुढेही अडचणी तयार करु याचे भान ठेवावे हीच माफक अपेक्षा!

वासुदेव काळे- सहकार व्याख्याता,सल्लागार,श्रीरामपूर
दि.24 /10/23 दसरा
संचालक-महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन
अध्यक्ष-सहकार भारती,अहमदनगर(उ)जिल्हा

error: Content is protected !!