संत नागेबाबा

सहकार विश्व

पतसंस्था चळवळ

राहाता तालुक्याला पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून समृद्ध करण्याची पतसंस्था प्रतिनिधींनी घेतली शपथ

राहाता : पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी भारतात सर्व प्रथम सहकारी साखर कारखाना स्थापन करून सहकाराची मुहूर्तमेढ अहिल्यानगर जिल्ह्यातील
राहाता तालुक्यातील लोणी या ठिकाणी रोवली. त्या राहाता तालुक्याला सहकारी पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून समृद्ध करणार असल्याची शपथ २० मे २०२४ रोजी राहाता तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी घेतली.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, राहाता तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन, जिल्हा स्थैर्य निधी संघ व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राहाता तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक व विचार मंथन शिबीर तालुक्यातील विठ्ठला लॉन्स, चितळी रोड या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
राहाता तालुका सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी सहकारी कायद्याला धरून सहकारी पतसंस्थांचे कामकाज कसे करावे ? या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या आढावा बैठक व विचार मंथन शिबिराचे प्रास्ताविक राहाता तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे यांनी केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले की, राहाता तालुक्यातील पतसंस्था सक्षम आहेत. त्यांनी ठेवीदारांचा विश्वास प्राप्त केल्यामुळे ३१ मार्च २०२४ अखेर तब्बल १ हजार कोटी रुपयांच्यावर ठेवी जमा झालेले आहेत. ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींचे संरक्षण करण्यासाठी, ठेवींना अधिकाधिक सुरक्षा मिळण्यासाठी राहाता तालुक्यातील सहकारी पतसंस्थांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने तयार केलेली क्रास प्रणाली व सिबिल रिपोर्ट वापरल्याशिवाय कोणालाही कर्ज देऊ नये. तसेच राज्य फेडरेशन व अक्षर सोल्युशनच्या माध्यमातून सुरू झालेल्या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरांचाही अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले.
या बैठकीला अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष वसंतशेठ लोढा, स्थैर्य निधी सहकारी संघाचे संचालक शिवाजी आप्पा कपाळे, पुखराज पिपाडा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राहाता तालुका पतसंस्था फेडरेशन उपाध्यक्ष साहेबराव निधाने, संचालक सतीश गंगवाल, डॉ. स्वाधीन गाडेकर, अशोकराव कोते, दिपकराव गांधी, राजकुमार काले आदींसह तालुक्यातील सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

error: Content is protected !!