सर्वसामान्य नागरिकांच्या व्याजाचे सहकारी पतसंस्थांनी वाचविले १०० कोटी रुपये – काका कोयटे, अध्यक्ष
अकोले : सोने तारण कर्ज वाटप हे जगातील अतिशय सुरक्षित कर्ज समजले जाते. पर प्रांतातील खाजगी कंपन्या २५ ते ३० टक्के अशा चढ्या व्याजदराने सोने तारण कर्ज वाटप करत असतात. या उलट जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था सोने तारण कर्ज वाटप ७ ते १२ टक्के व्याजदराने करीत असतात. केवळ अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांनी गत आर्थिक वर्षात अंदाजे १५०० कोटी रुपयांचा सोने तारण कर्ज वाटपाचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांनी कमीत कमी व्याजदरात सोनेतारण कर्ज वाटप करून सर्वसामान्यांच्या व्याजाचे १०० कोटी रुपये वाचविल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी संघ, नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि अकोले तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित ‘पतसंस्था चालकांनी संस्था चालवताना घ्यावयाची दक्षता’ या विषयावर विचार मंथन बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.
अकोले तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष विठ्ठलराव चासकर व उपाध्यक्ष भाऊ पाटील नवले यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या या विचार मंथन बैठकीला अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी संघ अध्यक्ष व मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष सुरेश वाबळे, नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष वसंत लोढा, श्रीरामपूर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचालक वासुदेव काळे आणि राहुरी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजी आप्पा कपाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी सुरेश वाबळे यांनी महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीचा आढावा घेतला. तसेच इतर जिल्ह्यातील अडचणीतील पतसंस्थांचे वारे अहमदनगर जिल्ह्यापर्यंत पोहचू नये. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका फेडरेशन अंतर्गत विचार मंथन बैठकीचे आयोजन करून जिल्ह्यातील पतसंस्था चळवळ सक्षम बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सुरेश वाबळे यांनी सांगितले.
तसेच नाशिक जिल्हा विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष वसंत लोढा म्हणाले की, महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचे चळवळ काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे सुरू असून पतसंस्था चळवळ अधिकाधिक सक्षम करण्यासाठी नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन प्रयत्नशील राहील.
तर वासुदेव काळे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात व अहमदनगर जिल्ह्यात तालुका फेडरेशनच्या सहकार्याने बैठका आयोजित करण्याचे कार्य राज्य फेडरेशनने हाती घेतले आहे. या कार्याला राज्यातील सहकारी पतसंस्था उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
अकोले तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष विठ्ठलराव चासकर यांनी तालुक्यातील सहकारी पतसंस्थांचा अहवाल सादर केला. तर उपाध्यक्ष भाऊ पाटील नवले यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मार्फत तालुक्यातील थकबाकी वसुलीचे काम प्रभावीपणे करणार असल्याचे सांगितले.