आपत्ती पतसंस्था समोरील व्यवस्थापनाला बदलावे लागेल
समाजातील काही व्यक्तींच्या समुहाने एकत्र येवुन,आपल्या गावातील,आपल्या भागातील समाजाला आपल्याकडे उपलब्ध नसलेली किंवा त्यांना हवी ती बॅंकेला पर्याय देणारी व्यवस्था, सेवा मिळावी या उद्देशाने एकत्र येवुन त्या समाज घटकाला सभासद करुन ती उपलब्ध करुन देण्याची हेतुने
सुरु केलेली व्यवस्था म्हणजे पतसंस्था!
कालांतराने समाजभान बदलत गेले,व्यवस्था बदलत गेल्या तशी ही चळवळ बदलत गेली.
मग सुरु झाली समस्यांची,अपेक्षांची मालीका!
आज या चळवळीतील व्यवस्थापना पुढे काही गंभीर प्रश्न आहेत.
म्हणुनच म्हटलय व्यवस्थापनाला बदलावे लागेल
*भांडवल आणि तरलता रोखीचे प्रमाण यामध्ये त्यांना कोणीच मदत करीत नाही.
*आज वाढती अनुत्पादीत मालमत्ता ( नेट NPA) हा मोठा प्रश्न आहे.
* वाढता ढोबळ एनपीए डोकेदुखी होत आहे.
खर तर पतसंस्था मधील कर्जदार सामान्य,परिचीत,सभासद व हितचींतक असतो,त्यामुळे त्याचे खाते NPA त जाणार नाही यासाठी कर्ज देतानाच त्याचे समुपदेशन करायला हवे.
थकबाकी मुळे व्यवसायावर बंधने येत आहेत. नफा क्षमतेवर मोठा परिणाम होतो आहे. बँकिंग व्यवसायातील मुळ तत्वांनाच धक्का बसतो आहे,त्यामुळे सभासद ठेवीदारांचा या चळवळी वरील विश्वास डळमळीत होतो की,काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे.
यामध्ये खरे तर सहकार खाते,सहकार भारती,महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांनी मार्गदर्शकाची भूमिका घेऊन या पतसंस्थांना अशक्ततेतून-अडचणीतुन बाहेर येण्यासाठी आणि सक्षम व सशक्त होण्यासाठी पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे व त्यांची ती मानसिकताही आहे.
. पण…पण…
दुर्देवाने पतसंस्था मधील व्यवस्थापन,संचालक मंडळ तहान लागली की,विहीर खांदतात,असे म्हणावे लागते.जो पर्यंत प्रश्न गळ्या पर्यंत येत नाही,गंभीर होत नाही तो पर्यंत पतसंस्थातील धुरीण मदत मागण्यासाठी,सहकार्य मागण्यासाठी येत नाहीत.
त्यामुळे मदत करणारेही काही करु शकत नाहीत
आज पतसंस्थामध्ये चांगला प्रशिक्षित कर्मचारी वर्ग मिळणे,त्यानां तयार करणे आणि टिकवणे ही फार मोठी कसरत आहे. चांगले शाखाधिकारी, CEO मिळत नाहीत. मिळाले तर ते फार काळ टिकत नाहीत.
त्यातच आता तंत्रज्ञान वापर करणे अनिवार्य झाल्यामुळे सभासदानां टेक्नाॅलाॅजी बेस सुविधा दयाव्याच लागतील. आता कर्मचारीही तसे घ्यावे लागतील.
सभासदांची माहिती सुरक्षीत ठेवण्यासाठी तसेच आपल्या व्यवस्थेची सर्व सुरक्षा यंत्रणा मजबूत ठेवण्यासाठी परिपूर्ण तंत्रज्ञान विकसीत करण्याची आणि त्यावर सातत्याने लक्ष ठेवण्याची पतसंस्थाची जबाबदारी आज वाढली आहे.
हार्डवेअर, सॉफ्टवेअर व AMC साठी भरीव तरतूद करावी लागेल. विश्वासु, प्रामाणिक व पतसंस्थाचे हित पहाणारे योग्य सप्लायर मिळवणे फार महत्वाचे आहे.कारण आपला सर्व डेटा त्यांचेकडे आहे.
त्यामुळे या कामासाठी नेमत असलेले कर्मचारी यांची आपल्या प्रती सर्वोच्च निष्ठा, व्यावसायिक नितिमत्ताचे भान बाळगणारे असल्याची खात्री करून नेमणूक झाली पाहिजे
याचबरोबर पतसंस्थामध्ये धोरणात्मक निर्णय घेणारे व्यवस्थापक / संचालक मंडळ हे अभ्यासू आणि प्रशिक्षित असले पाहिजे.पण आज अनेक पतसंस्थात व्यवस्थापनाचा अती हस्तक्षेप, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मत न ऐकता निर्णय घेणे यांमुळे अनेक पतसंस्था अडचणीत येत आहेत.
कर्मचारी भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गुणांवर आधारित असावी. अयोग्य नेमणुका झाल्यास संस्थेस पुढे त्या कर्मचा-यांतून अधिकारी वर्ग निर्माण करता येत नाही.
प्रशिक्षण हा खर्च आहे, अशी धारणा बदलावी लागेल.तर ही खरी गुंतवणूक आहे आणि त्यामुळे व्यवस्थापक मंडळाची व कर्मचा-यांची ज्ञानाची आणि काम करण्याची प्रगती होणार आहे,हे व्यवस्थापनाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
व्यावसायिकतेचा,अभ्यासू वृत्तीचा अभाव जर व्यवस्थापक मंडळात असेल तर व्यवस्थापनावर आणि एकूणच पतसंस्थेच्या कामकाजावर ते नीट देखरेख ठेवू शकत नाहीत,असा अनुभव आहे.ते संस्थेची प्रगती आणि प्रगतशील धोरणे राबवू शकत नाहीत. यासाठी संचालक मंडळ अभ्यासू, पुरोगामी, प्रगतीशील विचारांचे असायला हवे. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हा त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी योग्य माहिती पुरवणारा असावा, तरच संस्था स्पर्धात्मक परिस्थितीत टिकाव धरू शकतील..
आपआपसातील स्पर्धा, व्याजदराचे नियंत्रण, तंत्रज्ञानाचा रेटा, दूरदर्शी आणि सक्षम नेतृत्वाचा अभाव, व्यावसायिकतेचा अभाव, चांगल्या कर्जदारांची वानवा, सहकार खात्याची कठोरता, कराव्या लागणार्या वैधानिक तरतुदी ही सर्व आव्हाने समोर आहेत.
विनम्र, तत्पर, व्यक्तिगत ग्राहकसेवा हेच सहकारी पतसंस्थाचे बलस्थान आहे. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज आहे. व्यावसायिकता आणि नफा क्षमता वाढवत आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि उत्तम व्यवस्थापन असलेली सहकारी पतसंस्था चळवळ म्हणून याही झंझावातात आपण टीकणार आहोत.
यासाठी पाहिजे सेवा-सुविधा- पारदर्शीपणा- विश्वास- आधुनिकता- टेक्नाॅलाॅजी -मार्कैटींग या सप्तसुत्रीचा अवलंब!
वासुदेव काळे,श्रीरामपूर
मो.नं.9822837025
अनंत चतुर्थी दि.28/09/23
संचालक-महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन
अध्यक्ष-सहकार भारती,अहमदनगर(उ) जिल्हा